सागर घरत
करमाळा : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या भीमा नदीवरील डिकसळ पुलाचे (कोंढार चिंचोली ते डिकसळ) काम आजपासून (शनिवार) सुरु झाले आहे. पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्याला जोडणारा हा महत्वाचा पूल आहे. या पुलाचे काम व्हावे, यासाठी आमदार संजय शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन जुन्या रेल्वे लाईनवर डिकसळ- कोंढारचिंचोली दरम्यान हा पुल होता. आठ महिन्यांपूर्वी या पुलाचे एका बाजूच्या बांधकामाचे काही दगड निखळले होते. त्यामुळे या ठिकाणी मोठा बोगदा पडला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील जड वाहतूक बंद केली होती.
डिकसळ पुलासाठी महाविकास आघाडीचे सरकार असतानाही आमदार शिंदे यांचे प्रयत्न सुरु होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी या कामासाठी निधी मिळवला. प्रशासनाने पुलाचे डिझाईन दिलेले असतानाही संबंधित ठेकेदाराने त्यांच्या पद्धतीने डिझाईन करण्यासाठी वेळ घेतला होता. त्यामुळे काम लांबले होते. तीन वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांसाठी भिगवण, बारामती, दौंड, इंदापूरला जाण्यासाठी आणि बाजारपेठेच्या दळणवळणासाठी हा पूल महत्वाचा आहे. यापूर्वी येथे काम सुरु झाले होते, मात्र काही अडचण आल्यामुळे काम थांबले होते. आता काम पुन्हा सुरु झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.