जिंती : आपण दान केलेले रक्त एखाद्याचे जीव वाचवू शकते किंवा एखाद्या गंभीर परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला मदत करू शकते. हे जाणून घेतल्यास आपल्याला मानसिक उत्तेजन, मानसिक समाधान मिळते. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःचे रक्त सांडले, आपण रक्तदान शिबिराच्या माध्यमातून लोकांचे प्राण वाचवले पाहिजेत. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष ॲड. नितीन राजेभोसले यांनी केले आहे.
करमाळा माढाचे आमदार संजय शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिंती (ता. करमाळा) येथे भव्य रक्तदान शिबिराचे मंगळवारी (ता.३०) आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्सुर्त सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन ॲड. नितीन राजेभोसले यांनी केले. यावेळी जिंती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आफ्रीन शेख, डॉ. बाबासाहेब गाढवे, सिकंदर मुलाणी, कल्याण वारगड, शोएब शेख, अक्षय निकम, स्वप्नील जगताप, निलेश कोकरे, निलेश थोरात व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना ॲड. नितीन राजेभोसले म्हणाले, अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. रक्तदानामुळे अपघातग्रस्तांव्यतिरिक्त अनेकांना फायदा होतो. तुमचे दान केलेले रक्त गर्भधारणेच्या गुंतागुंतीमुळे ग्रस्त असलेल्या महिलेचे, आजारामुळे किंवा अपुऱ्या पोषणामुळे गंभीर अशक्तपणाने ग्रस्त असलेल्या मुलाचे आणि कर्करोगावर उपचार घेत असलेल्या एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरासारख्या समाजोपयोगी उपक्रमाच्या मध्यमात सहभागी झाले पाहिजे.
रक्तदान करणे हे फक्त एक महान कार्य नाही, तर रक्तदान केल्यामुळे अनेक आरोग्य फायदे देखील मिळतात. रक्त संक्रमण हे ॲनिमिया, कॅन्सर अशा अनेक आरोग्यविषयक विकारांवर उपचार करण्यासाठी केले जाते. हेल्थ केअर इंडस्ट्रीसाठी रक्ताचा अखंड पुरवठा होण्यास मदत होत असल्याने लोकांना रक्तदान करावे. असे आवाहन राजेभोसले यांनी केले आहे.
दरम्यान, या रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस, जिंती प्राथमिक आरोग्य केंद्र व करमाळा येथील कमलाईदेवी ब्लड बँक यांच्या संयुक्त वतीने करण्यात आले होते. या शिबिरासाठी कमलाईदेवी ब्लड बँकेचे डॉ. तन्वी साखरे, अनुराधा आंधळकर, हुमेरा शेख, गणेश सपकाळ, संतोष यमकर, प्रशांत शिंदे, राम चव्हाण, कुणाल कुरळे यांचे बहुमूल्य योगदान मिळाले. यावेळी २८५ बाटल्यांचे रक्त संकलन करण्यात आले.