कोल्हापूर : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीचा कोल्हापुरात अपघात झाला आहे. या अपघातात तानाजी सावंत आणि त्यांचे स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी झाले आहेत. करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर ते जोतिबाच्या दर्शनासाठी जात होते. सावंत ज्या कारमधून जात होते, त्याच्या मागे असलेल्या कारला एका कारने जोरदार धडक दिली. यात त्यांच्या स्वीय सहाय्यकालाही मार लागला आहे.
कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर राजपूत वाडी येथे हा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, कारचा चेंदामेंदा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.अपघात झाल्यानंतर जिल्हा प्रशासानाकडून सावंत यांना रुग्णवाहिका देण्यात आली नसल्याचं सांगितलं जात आहे.
तानाजी सावंत यांनी कोल्हापुरातील गोरगोटी उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन केलं. या सोहळ्याला हसन मुश्रीफ यांनी पाठ फिरवली. तानाजी सावंत यांच्या हस्ते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकार्पण सोहळा होणार होता. पण मुश्रीफ कोल्हापूरचे असूनही सोहळ्याला आले नाही. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यात हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर आमनेसामने आले होते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.