सांगली : एक सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. माझी आणि माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल, तर मी उमेदवार मागे घेण्यास तयार असं विधान सांगली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केलं आहे. तसेच ते म्हणाले, फक्त शेतकऱ्यांचा मुलगा खासदार व्हायला नको, हे काँग्रेसने उघडपणे येऊन सांगावे. मान्य आहे, माझ्याकडे कारखाना नाही, मी माजी मुख्यमंत्र्यांचा नातू नाही, असंही चंद्रहार पाटील यावेळी म्हणाले.
आज सांगलीत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला यावेळी चंद्रहार पाटील बोलत होते. यावेळी जयंत पाटील, शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे-पाटीलही मंचावर उपस्थित होते.
काय म्हणाले चंद्रहार पाटील?
शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी माझ्या उमेदवारीची घोषणा केली. मिरज येथे उद्धव ठाकरे यांची मोठी सभा पार पडली, तिथे दुसऱ्यांदा उमेदवारीची घोषणा झाली. तिसऱ्यांदा पक्षाच्या वतीने अधिकृतपणे पत्राद्वारे माझ्या उमेदवारीची घोषणा झाली. चौथ्यांदा महाविकास आघाडीच्या पत्रकात माझ्या उमेदवारीची घोषणा झाली.
एका उमेदवाराची चारवेळा घोषणा होऊन सुद्धा अजून आपले मित्रपक्ष आपल्यापासून लांब आहेत. नेमकं त्यांचं दुखणं काय आहे, हे अजूनही माझ्या लक्षात आलं नाही. एका शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतोय, हे तुमचं दुखणं आहे? की, शिवसेना पक्षाची ताकद येथे कमी आहे, हे तुमचं दुखणं आहे? असंही पाटील यावेळी म्हणाले.