आयुष्यात यश मिळावायचे असेल कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. संकटातून यशाचा मार्ग सोपा करण्याची ताकद ही मनगटात असावी लागते. कोणत्याही क्षेत्रात सराव, त्याच बरोबर कष्ट करून आत्मविश्वासाने ध्येय निश्चित केले असेल तर यश आपल्या सोबत असते. सातारा जिल्ह्यातील कारी (ता. सातारा) प्रतिक्षा लक्ष्मण मोरे हिने देखील कोणता कांगावा न करता मल्लखांब क्रिडा प्रकारात जिद्दीने सराव केला. त्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी शासनाने तिला शासनाचा शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
सातारा जिल्ह्यातील सज्जगडाच्या पायथ्याला कारी हे छोटेसे गाव आहे. वडिलांचे नाव लक्ष्मण मोरे तर आईचे शकुंतला मोरे. शेतकरी गरीब कुटूंबात प्रतीक्षाचा जन्म झाला. जिल्हा परीषडेच्या शाळेत तिचे प्राथमिक शिक्षण झाले असून याच काळात मल्लखांब प्रशिक्षिका माया विश्वतेज मोहिते यांची भेट झाली. त्यांच्याकडून लहानपणीच मल्लखांबाचे बाळकडू तिला मिळाले. मोहिते यांना देखील राज्य शासनाचा क्रिडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे तिला प्रशिक्षणात चांगलीच गोडी निर्माण झाली होती.
घरची परीस्थीती जेमतेम, त्यात दोन बहिणी व एक भाऊ असा परिवार होता. त्यात मोठी बहीण प्रियंका हि देखील मल्लखांब प्रशिक्षण घेत होती. प्रियंका चे प्रशिक्षण पाहून प्रतिक्षा देखिल सात वर्षापासून मल्लखांबाचा सराव करू लागली. माध्यमिक शिक्षण गावातून झाल्यानंतर तिने सातारा येथे बी. ए. पदवी पर्यतचे शिक्षण घेतले. या काळात अनेक अडचणीना सामोरे जात तीने शिक्षण पुर्ण केले. मात्र, मल्लखांबाची आवड आणि त्यातच करीयर करायचे असे ठरविल्याने तीने मल्लखांबाचा सराव सुरू ठेवला.
2013 ला पहिली राष्ट्रीय स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये वैयक्तिक सुवर्ण व सांघिक सुवर्ण अशी दोन पदके तिने मिळवली. 2013 ते 2018 या कालावधीमध्ये पाच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करून महाराष्ट्रासाठी वैयक्तिक सुवर्ण आणि सांघिक सहा सुवर्णपदक मिळवली. ३ वैयक्तिक, तीन रोप्य पदक मिळवले तसेच 2018 ला मल्लखांब च्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झाली. या स्पर्धेपूर्वीचा काळ अतिशय कष्टाचा गेल्याचे ती आवर्जून सांगते. २०१९ पहिल्यांदा स्पर्धेमध्ये पोल मल्लखांब ची स्पर्धा ही मुलींसाठी घेण्यात आली होती. याकाळात प्रशिक्षक विश्वतेज मोहिते सर यांनी पोल मल्लखांबचे प्रशिक्षण घेतले. खूप कमी दिवसात दिलेला सराव त्यात जिद्द व कष्ट आणि मोलाचे मार्गदर्शन होते.
प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये खेळत असताना थोडी भीती वाटत होती. कारण भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. आपल्याकडून कोणती चूक होऊ नये याची ती भीती होती. पण त्या स्पर्धेत मध्ये सांघिक १ सुवर्ण आणि वैयक्तिक ३ रोप्य पदके प्राप्त केली. हा खूप आनंदाचा क्षण होता. कारण देशाचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. त्यामुळेच सातारा जिल्ह्याचा उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार २०१९ मध्ये मला मिळाला. त्यानंतर 2019-20 चा महाराष्ट्र शासनाचा खेळातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने तिला सन्मानित केले. त्याचे वितरण २०२३ ला झाले.
त्यावेळी राज्यातून प्रेक्षकांनी दिलेली शाब्बासकी मला आजही प्रेरणा देते. मल्लखांब नुसता क्रिडा प्रकार नसून आपल्या आरोग्याच्या दृष्टिने फायदेशिर आहे. मल्लखांब हा क्रिडा प्रकार निवडला त्याचा मला अभिमान आहे. असेही प्रतिक्षा सांगते. सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात सध्या ती शाररीक शिक्षणाची पदवी (बीपीएड) च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तिची जिद्द, चिकाटी व कष्ट इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.