कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या वाहनांच्या ताफ्याचे आगमन झाल्यानंतर गाडीतून उतरताच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ताफ्यात जुन्या गाड्या असल्याबद्दल विचारणा केली. गाड्या काय झाल्या ओ कलेक्टर, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी तातडीने नव्या गाड्यांचा प्रस्ताव पाठवा, त्याला लगेच मंजुरी देऊन टाकतो, असे सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रोटोकॉल विभागाला पाच गाड्यांचा प्रस्ताव दिल्याची माहिती दिली.
उपमुख्यमंत्री पवार गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचे जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम होते. दरम्यान, दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर त्यांनी बैठक बोलावली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर लगेचच पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून गाड्या काय झाल्या ओ कलेक्टर ? अशी विचारणा केली. गाड्या नसतील, तर नव्या गाड्या घेण्यासाठी प्रस्ताव देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. लगेचच त्यास मंजुरी देण्याची ग्वाही दिली. त्यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाच गाड्यांचा प्रस्ताव यापूर्वीच दिल्याचे सांगितले.
गेल्यावेळीच बोललो होतो: पवार
ताफ्यातील वाहनांबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतानाही पुनरुच्चार केला. ते म्हणाले, प्रशासनाकडे तीनच वाहने आहेत, त्यापैकी डीव्ही कार परभरणीला पाठवली आहे. उरलेल्या दोनमध्ये एकच गाडी उपलब्ध आहे. गेल्यावेळीच मी नवीन वाहने घेण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. मंत्री, शासनाचे प्रतिनिधी किंवा न्यायाधीश दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना सुस्थितीतील वाहने उपलब्ध झाली पाहिजेत म्हणून आता पाच वाहनांचा प्रस्ताव दिला असून, तो तातडीने मंजूर करू, असेही त्यांनी सांगितले.