लहू चव्हाण
पाचगणी : सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग व महाबळेश्वर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भारती विद्यापीठ हायस्कूल गोडवली (पाचगणी, ता. महाबळेश्वर) येथे १२ ते १४ डिसेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्वच शाळांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाबळेश्वर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी केले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन महाबळेश्वर तालुक्याच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रभावती कोळेकर, गटविकास अधिकारी अरुण मरभळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) तेजस गंबरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
याविषयी माहिती देताना पळसे म्हणाले की, प्रदर्शनाचा विषय ‘समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ असा असून, त्यामध्ये आरोग्य, जीवन, शेती, दळण-वळण आणि वाहतूक, संगणकीय विचार असे पाच उपविषय आहेत. प्रदर्शनात तालुक्यातील सर्व उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा सहभाग असणार आहे. प्रदर्शनाच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध, चित्रकला आणि प्रश्नमंजूषा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सहावी ते आठवी प्राथमिक व इयत्ता नववी व दहावी माध्यमिक तर इयत्ता अकरावी व बारावी उच्च माध्यमिक असे तीन गट निश्चित करण्यात आले आहेत.