पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगलाच पाऊस पडताना दिसतो आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर जिल्ह्यांसह विविध भागात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असून पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जुलै महिना हा पावसाचा असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढचे दोन दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्ती केली आहे. राज्यातील काही भागांत ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि नांदेड मध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
जुलै महिन्यात 106 टक्क्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतील अनेक भागांत गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु आहे. वसई, विरार नालासोपाऱ्यात सकाळपासून दमदार पावसाची हजेरी सुरु आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती.