Vijay Vadettiwar |पुणे- सध्या राज्यात आणि देशात सावरकरांवरून वातावरण तापलेलं आहे. त्यातच काँग्रेस नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि प्रदेश युवर काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी ‘सावरकर म्हणायचे की बलात्कार हे एक राजकीय हत्यार आहे, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा’, असं विधान केलं. त्यावर राजकीय वातावरण तापलेलं असताना यावर विजय वडेट्टीवार यांनी याविषयी स्पष्टीकरण दिलेलं आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘हा विषय फार गंभीर आहे असं मला वाटत नाही”, असं म्हटलं आहे. मी शिवानीला विचारलं की हा कुठला संदर्भ घेऊन तू बोललीस. ती म्हणाली सावरकरांनी लिहिलेलं ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातला संदर्भ ती सांगत होती. ती पुस्तकाचा आधार घेऊन बोलली असेल, तर त्यावर वाद होण्याचं काही कारण नाही. पण मला माहिती नाही की ती कोणत्या संदर्भात बोलली आहे. ती स्वत: वकील आहे. त्यामुळे तिला वाचनाचाही मोठा छंद आहे. कुठल्यातरी पुस्तकाचा तिने संदर्भ घेतलाय असं तिचं मत आहे. यावर ती अधिक बोलू शकेल.’
काय आहे प्रकरण…
शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केलं आहे. शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या होत्या की, ‘हे लोक फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाही. ते सावरकर मोर्चा काढतात. मला आणि माझ्यासह इतर भगिनी महिलांना भीती वाटत असेल. सावरकर म्हणायचे बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. ते तुम्ही तुमच्या विरोधकांच्या विरोधात वापरलं पाहिजे. मग माझ्यासारख्या महिला-भगिनींना सुरक्षित कसं वाटेल? अशा लोकांच्या प्रचारासाठी हे लोक मोर्चा काढतात.’ हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.