Amravati Crime News : अमरावती : मन हेलावून टाकणारी घटना अमरावतीमधून समोर आली आहे. महाप्रसादाला नेतो असे सांगत तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही खळबळजनक घटना अमरावतीतील मालखेड येथून समोर आली आहे.
वरुड तालुक्यातील मालखेडमधील तरुणीला महाप्रसादासाठी नेतो, असं तिच्या आईला सांगून आरोपीने तरुणीला दुचाकीवर बसवून नेले आणि घरी कोंडून ठेवले. त्यानंतर तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने बाईकवर बसवून शेतात नेले आणि तिथे तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पाच जणांनी तरुणीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले.
अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल
महेश वाघमारे, पिंटू हरले, रमेश भलावी, इस्माईल खाँ, नितीन ठाकरे सर्व राहणार मालखेड अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
आरोपी महेश वाघमारे हा मुख्य आरोपी आहे. पीडितेला महाप्रसादासाठी मालखेड येथे घेऊन जातो, असे तिच्या आईला सांगून तरुणीला घेऊन गेला. आरोपीने पीडितेला रात्रभर त्याच्या घरी कोंडून ठेवले. 28 जानेवारी रोजी तरुणीला तिच्या गावी सोडण्यासाठी आरोपी महेशने तिला दुचाकीवर बसवले. मात्र, त्यानंतर आरोपीने तरुणीला गावी न नेता दुसऱ्या आरोपीसोबत शेतात नेले. आरोपी महेशने पिंटू हरले याला सोबतीला घेतले आणि दुचाकीवर दोघे जण पीडितेला मालखेड शिवारातील शेतात घेऊन गेले. यानंतर दोघांनी शिवारात तिच्यावर लैंगीक अत्याचार केले. यादरम्यान तिथे आणखी तीन आरोपी आले आणि त्यांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याकाळात पीडितने विरोध केला. मात्र, आरोपींनी तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नाही तर या घटनेबाबत कुठेही वाच्यता केली तर जीवे मारू अशी धमकीही आरोपींनी तरुणीला दिली होती.