भंडारा : पती आणि मुलाला मारहाण होत असताना वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेच्या बोटाचा चावा घेऊन दुखापत केल्याची घटना लाखांदूर येथे घडली. या प्रकरणाची तक्रार लाखांदूर पोलिस ठाण्यात देण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संतोष विठ्ठल नहाळे (वय 38) व विठ्ठल महादेव नहाळे (वय 67, रा. लाखांदूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील पीडित महिलेच्या घराचे बांधकाम सुरू आहे. यासाठी विटा व अन्य साहित्य तिने घराशेजारी ठेवले होते. या साहित्यामुळे जाण्यायेण्यास अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करत संतोष नहाळे व विठ्ठल नहाळे यांनी महिलेच्या पतीसह मुलाला मारहाण केली.
दरम्यान, त्यांना वाचविण्यासाठी महिला गेली असता विठ्ठल नहाळे याने महिलेच्या बोटाचा चावा घेऊन दुखापत केली. जखमी महिलेला लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या महिलेच्या तक्रारीवरून दोघांवर लाखांदूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास लाखांदूर पोलिस करत आहेत.