भंडारा : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेले असताना, भंडाऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाच्या वेळी गोंधळ उडाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज भंडाऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मात्र, या वेळी अजित पवार यांच्या भाषणादरम्यान गोंधळ झाला. आरक्षणाची मागणी पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशी घोषणा देत एका व्यक्तीने हातातील बॅनर फडकावले. या व्यक्तीला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवार भाष्य करत असतानाच हा गोधळ झाल्याची माहिती मिळत आहे.
आरक्षण देताना ते सुप्रीम कोर्टात टिकले पाहिजे. इतर समाजालाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होता कामा नये, असे प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, काही लोक वेगळ्या पद्धतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भंडारा येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात भाषणातून केला. आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना हा गोंधळ झाला. डेंग्यूच्या आजारातून बरे झाल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिलाच कार्यक्रम होता.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले, की काही कारणांनी हा कार्यक्रम पुढे जात होता. मुख्यमंत्र्यांनी ठरवलं दिवाळीनंतर पहिला कार्यक्रम भंडाऱ्यात करायचा. शासनाच्या कल्याणकारी योजना यामुळे सामान्य जनतेला मिळतात. भंडारा निसर्ग पर्यटनासाठी अनुकूल जिल्हा आहे. या ठिकाणी मुबलक पाणी आहे. आमच्या सरकारच्या योजना लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेतला आहे. सरकारचा कारभार लोकाभिमुख व्हायला हवा. राज्यातील प्रत्येक नागरिकाला हे सरकार माझ्यासाठी काम करत असल्याची भावना निर्माण झाली पाहिजे.
या वेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, हे लोकाभिमुख सरकार आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून अनेक लाभ दिले जात आहेत. गेल्या सव्वा वर्षात अनेक चांगले निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत. एक रुपयात पीक विमा योजना त्याचेच एक उदाहरण आहे. याच योजनेत अग्रीम नुकसानभरपाई दिली जाते. आतापर्यंत ४७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ९६४ कोटींची मदत दिली गेली आहे. उर्वरित एक हजार कोटी रुपये लवकरच दिले जाणार असल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमादरम्यान दिली.