नागपूर : दिवाळीच्या फटाक्यांमुळे राज्यात अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यातच मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका चालत्या ट्रकने अचानक पेट घेतल्यामुळे महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार पहायला मिळाला. चालकाच्या समयसूचकतेमुळे जीवितहानी टळली असली, तरी या घटनेत ट्रकमधील लाखो रुपयांच्या साड्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे मोठी वित्तहानी झाली आहे.
मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा तालुक्यातील वडी गावानजिक चालत्या ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली. आर्को ट्रान्सपोर्ट कंपनीचा हा ट्रक सुरतहून नागपूरकडे निघाला होता. ट्रकला अचानक आग लागली. प्रसंगावधान राखत चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. त्यामुळे हानी टळली. मात्र, ट्रकमधील लाखो रुपयांच्या साड्या जळून खाक झाल्या.
फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाच्या कारणामुळे उच्च न्यायालयाने काही सूचना दिल्या होत्या. या निर्देशाप्रमाणे मनपासह नागपूर पोलीस विभागाला फटाके फोडण्यासाठी वेळ निर्धारित करण्यात आली होती. ज्यामध्ये सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत फटाके फोडता येतील, अशा सूचना दिल्या होत्या. शिवाय दिलेल्या वेळेचे पालन न केल्यास कार्यवाहीच्या दृष्टीने देखील उच्च न्यायालयातर्फे सूचना दिल्या होत्या.
मात्र, शहरात अनेक ठिकाणी या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे चित्र दिसले. फटाक्यांमुळे नागपुरात काही आगीच्या घटना देखील घडल्या आहेत. ज्यामधे गणेशपेठ आणि संतनामी नगर येथील घटनेचा समावेश आहे.