भंडारा : भजनाचा कार्यक्रम आटोपून गावाकडे परतणाऱ्या भजनी मंडळाचा टेम्पो नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत 2 मुली वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना २७ सप्टेंबर रोजी शुक्रवारी पहाटे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात घडली आहे. या अपघातात १३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील खांबा येथील भजनी मंडळातील १३ जण ताज मेहंदी बाबांच्या कार्यक्रमासाठी भीवखिडकी येथे गेले होते. २६ सप्टेंबर रोजी रात्री भजन आटोपल्यानंतर हे भजनी मंडळ गावाकडे जात होते. या भजनी मंडळात ५ ते ७ वर्षीय २ लहान मुलींसह १३ जणांचा समावेश होता. रस्त्यात पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास जांभळी वडेगाव मार्गावरील वडेगाव येथे ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो नाल्यात कोसळला.
दरम्यान, त्यामध्ये २ चिमुकल्या मुली पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या. तर इतर १३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. ते सुखरुप नाल्याबाहेर बाहेर पडले आहेत. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आणि साकोलीच्या पोलिस पथकाने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली आहे. क्रेनच्या सहाय्याने टेम्पो नाल्यातून बाहेर काढण्यात आला आहे. सध्या एनडीआरएफच्या पथकाच्या माध्यमातून वाहून गेलेल्या २ मुलींचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे.