अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : गेल्या अनेक दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यासह घाटंजी तालुक्यातील शेतकरी व विविध योजनेचे लाभार्थी मूलभूत प्रश्नासाठी सरकार व प्रशासनाकडे येरझारा मारत असल्याने त्रस्त झाले आहे. चालू वर्षी ऑगस्टच्या अति पावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस व तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. घाटंजी तालुक्यातील प्रत्येक मंडळात अशी विदारक परिस्थिती असतांना घाटंजी तालुका प्रशासनाकडून शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी सकारात्मक कार्यवाही होत नसल्याचे दिसून येते.
घाटंजी येथील पंचायत स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे तीन तेरा वाजले असून जुलै 2024 पासून मजुरांच्या मजुरीची रक्कम प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हजारो सिंचन विहीरी, गुरांचे गोठे, घरकुलची कामे अर्धवट पडून आहे. त्याचप्रमाणे मोदी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आदिवासी आवास योजना, रमाई आवास योजनेतील लाभार्थी गेल्या सहा महिन्यांपासून चातकाप्रमाणे निधीची वाट पाहत आहे.
भर पावसाळ्यात त्यांच्या घराचे बांधकाम अर्ध्यावर पडून आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात बांधकाम कामगारांना घरगुती भांडे संच व पाल्यांना विद्यार्थी स्कॉलरशिप मोठ्या प्रमाणात वाटप सुरू आहे. परंतु घाटंजी तालुक्यात मात्र सदर योजना मोजक्याच लाभार्थ्यांना मिळाली असून हजारो पात्र कामगार लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. अशा वंचित घटकाला ग्रामपंचायतच्या सचिवाकडून 90 दिवसांचे कामगार प्रमाणपत्र सुद्धा मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे.
नुकतीच राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून लाडकी बहीण योजना आणली परंतु घाटंजी तालुक्यातील हजारो महिला या योजनेच्या लाभांपासून वंचित आहे. घाटंजी तालुक्यातील विविध योजनेपासून वंचित असलेल्यांना न्याय मिळावा याकरिता राष्ट्रीय ओबीसी जागरण अभियानचे संयोजक पांडुरंग निकोडे यांच्या नेतृत्वात 8 ऑक्टोबर 2024 रोजी मंगळवारला घाटंजी तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
यावेळी आर्णी- केळापूर विधानसभाचे युवा नेतृत्व जितेंद्र मोघे, शेतकरी नेते मोरेश्वर वातीले, प्राऊडीस्ट ब्लॉकचे मधुकर निस्ताने, पांढरकवडा काँग्रेस पक्षाचे नेते ॲड. अनिल किनाके, ॲड. खुशाल शेंडे, दि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अध्यक्ष व संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य आशिष लोणकर, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष माणिक मेश्राम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिषेक ठाकरे, घाटंजी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष रुपेश कल्यमवार, व घाटंजी तालुक्यातून विविध योजनेचे वंचित लाभार्थी, महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.