यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत आहे. या घटनेत प्रियकराने चक्क विवाहित महिलेला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत तिची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना यवतमाळच्या राळेगाव परिसरातील पिंपरी दुर्ग येथील खदानी जवळ घडली असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास राळेगाव पोलीस ठाणे करीत आहे.
पैशांची मागणी बेतली जीवावर..
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विवाहित महिलेने या घटनेतील संशयित आरोपीकडे सतत पैशाचा तगादा लावला होता. याच कारणावरून अनेकदा त्यांच्या दोघांमध्ये वाद सुद्धा झाले होते झाला होता. दरम्यान हे प्रकरण टोकाला जाऊन त्याच रागात या प्रियकराने हत्या केली. परिणामी, आपण हत्या केल्याची कबुलीही त्याने पोलिसांकडे दिली आहे.
आरती शरद कोवे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर ही महिला गावातील बाजार करण्यासाठी घराबाहेर निघाली होती. मात्र, ती उशीरापर्यंत घरी परतलीच नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी तीचा शोध घ्यायाला सुरवात केली. तेव्हा ती एका निर्जन स्थळी एका झुडपात मृत अवस्थेत आढळून आली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
नागरिक आक्रमक, आंदोलनाचा इशारा…
राळेगाव येथील विवाहित महिलेची हत्या प्रकरणात आता आदिवासी समाज संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा पोलीस अधीक्षक याच्या कार्यालयावर आदिवासी समाज बांधव धडकले आहेत. तर या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.