गडचिरोली : गडचिरोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बायकोला मोबाइलचा चार्जर दिला नाही म्हणून आलेल्या रागात एका तरुणाने रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या तरुणीला बेदम मारहाण केली असल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. गडचिरोलीच्या आरमोरी शहरामध्ये ही घटना घडली आहे. तरुणीला मारहाण करत असल्याची घटना रेस्टॉरंटमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीच्या आरमोरी शहरातील वडसा टी पाईंटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सोहेल शेख नावाचा तरुण आपल्या पत्नीसोबत नाश्ता करण्यासाठी या टी पॉईंटमध्ये आलेला होता. काही कामानिमित्त तो बाहेर गेला. त्याच्या पत्नीने रेस्टॉरंटच्या काऊंटवर असलेल्या तरुणीला चार्जर मागितला. तरुणीने चार्जर द्यायला नकार दिला, नंतर ही बाब या महिलेने आपल्या पतीला सांगितली.
आपल्या बायकोला तरुणीने मोबाइलचा चार्जर दिला नाही त्यामुळे तो तरुण संतापला. त्याने १९ वर्षीय तरुणीला बेदम मारहाण केली. यावेळी या तरुणाने आपल्या मित्रांना देखील बोलावले. तरुणाच्या मित्रांनी देखील तरुणीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली असल्याची माहीती मिळत आहे. मुलीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी सोहेल शेख आणि अयुब शेख या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. परंतु त्यांना अटक केलेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.