नागपूर : नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये जेवण वाढण्यावरुन दोन कैद्यांमध्ये जोरदार राडा झाला असून या राड्यानंतर दोन्ही कौद्यांमध्ये मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे. जखमीवर सध्या उपचार सुरू आहेत. सुमित मून असे जखमी कैद्याचे नाव असून त्याच्याकडे तुरुंगात जेवण वाटपाची जबाबदारी आहे. ७ ऑगस्टला त्याचे आरोपी कैदी सिद्धेश घाडगे आणि मनोज वाघमारे यांच्याशी भाजी वाढण्यावरुन वाद झाला होता.
याच वादातून 7 ऑगस्टला जर्मनच्या भांड्याने सुमितच्या डोक्यावर वार करण्यात आला. या मारहाणीत सुमित मून गंभीर जखमी झाला. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून धंतोली पोलीस स्टेशनमध्ये आरोपी कैद्यांविरुद्ध विविध कलमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.