नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या हत्येचा थरार बघायला मिळाला आहे. एका व्यक्तीने चार जणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सातवर ही धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर लोहमार्ग पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सातवर एका मनोरुग्ण व्यक्तीने चौघांवर हल्ला केला आहे. आरोपी मनोरुग्ण या चौघांनाही मारत सुटला होता. रेल्वेच्या रुळात उपयोगात येणाऱ्या लाकडी राफटरने आरोपी त्यांच्यावर हल्ला करत होता. या हल्ल्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. गणेश कुमार डी (५४ वर्षे राहणार दिंडीगुल, तामिळनाडू) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. तर दुसऱ्या मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जयराम रामअवतार केवट (३५ वर्षे) असे आरोपीचे नाव असून नागपूर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.