अमरावती : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्ष जोरदार तयारीत आहेत. नेते दावे-प्रतिदावे करताना दिसून येत आहेत. अशातच आता अमरावतीच्या मोर्शीचे अजित पवारांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. ते एका जाहीर कार्यक्रमात बोलताना ‘चांगल्या मुली नोकरदारांना मिळतात, तर दोन नंबरच्या काळ्या मुली पानवाल्यांना मिळातात’ अशा आशयाचे विधान केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अधिक माहिती अशी की, अजित पवारांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी जर स्मार्ट हवी असेल तर ती तुमच्या, माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही. नोकरीवाल्याला भेटते. दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्यांचा पान ठेला आहे, धंदा, किराणा दुकान आहे, अशा माणसाला दोन नंबरची पोरगी भेटते आणि तीन नंबरचा गाळ, राहिलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना भेटते, शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं राहिलं नाही. आमदार देवेंद्र भुयार यांच्या महिलांविरोधातील या वादग्रस्त वक्तव्यांनंतर संतापाची लाट उसळली आहे. राजकीय वर्तुळातून सुद्धा टीका केली जात आहे.
देवेंद्र भुयार यांचे हे वक्तव्य हे फक्त स्त्रियांचा अवमान करणारे आहे असे नाही, हे वक्तव्य इथल्या कृषी क्षेत्रासाठी काम करणाऱ्या भूमीपुत्रांची टिंगल टवाळी करणारे आहे. परंतु अजित पवार गटाचे लोक यांना बोलण्याचे काही ताळतंत्र राहिलं नाही. या लोकांना वाटते की कोणतंच पोलिस स्टेशन आमच्यावर कारवाई करू शकत नाही. या मस्तवालपणातून अशी वाक्य येतात. पण शेतकरी आणि महिलांची टींगल करणं हाच तुमचा अजेंडा आहे का? हे एकदा अजित पवार यांना विचारले पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे.