हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठका घेतल्या जात आहेत. अशाच प्रकारे हिंगोली काँग्रेसची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीदरम्यान दोन गट एकमेकात भिडल्याचे बघायला मिळाले. यावेळी दोन्ही गटांमध्ये मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीसाठी हिंगोलीत काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीत अंतर्गत गटबाजीतून काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हिंगोली शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी पवन उपाध्ये यांना या बैठकीत मारहाण सुद्धा करण्यात आली आहे. काँग्रेसचे पक्ष निरीक्षक कुणाल चौधरी व विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यापुढेच हा राडा झाला आहे.
दरम्यान, हिंगोली विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असलेल्या प्रकाश थोरात यांच्या मुलासह कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसचे पदाधिकारी पवन उपाध्ये यांनी यावेळी केला आहे. या घटनेनंतर हिंगोली पोलिसांनी तातडीने बैठकीच्या ठिकाणी धाव घेत काँग्रेस कार्यकर्त्यांचा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.