नागपूर : सहायक पोलीस निरीक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य पोलीस दलातील १०३ क्रमांकाच्या तुकडीतील ४४० सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयातून महसूल संवर्गाची यादी प्रकाशित करण्यात आली आहे.
मंगळवारी सायंकाळी ही यादी प्रकाशित केली असून २५ एप्रिलपर्यंत बंधपत्र भरून सादर करण्याचे आदेशही देण्यात आले असल्याची माहित समोर येत आहे. या निर्णयाने राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आनंदी-आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकसभा निवडणूक काळातील निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांची स्थिती लक्षात घेऊन महासंचालक कार्यालय लवकरात लवकर पदोन्नती देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे बंधपत्र आणि महसूल संवर्गाचा विषय दोन आठवड्यातच मार्गी लावणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
येत्या पंधरा दिवसांत निवडसूचीत नावे असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना संवर्ग स्वीकारल्यानंतर अंतिम यादी लवकरच प्रशिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, येणाऱ्या मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
४४० अधिकारी होणार पोलीस निरीक्षक
राज्य पोलीस दलातील १०३ तुकडीतील ४४० सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. पोलीस दलातील सेवानिवृत्ती आणि पदोन्नतीमुळे पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची वाणवा होती. मात्र, आता चारशेहून अधिक पोलीस निरीक्षकांची भर पडणार आहे.