अकोला : भारतीय जाणतां पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी पोलिसांवर केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर विरोधकांनी नितेश राणे यांच्यासह सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नितेश राणे यांचा उल्लेख ‘वेडा आमदार’ असा केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी नितेश राणेंच्या पोलिसांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना त्यांना फार महत्त्व देऊ नये असं म्हटलंय. त्यांच्या वक्तव्यामुळे फार काही फरक पडणार नाही. यासोबतच पोलिसांनी आणि जनतेनेही त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नये, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान पोलीस माझं काही वाकडं करु शकणार नाही, आपला बॉस ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे. तुम्ही कार्यक्रम करा, तुम्हाला सुखरूप घरी पोहचवण्याची जबाबदारी आमची असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर अकोल्यातील एका सभेत भाषण करताना पुन्हा नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पोलीस फक्त आपल्या सभेचे व्हिडीओ काढतील आणि घरी बायकोला दाखवतील, त्यापेक्षा पोलीस जास्त काही करू शकत नाहीत, आपण पोलिसांना घाबरत नाही, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केले होते. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी देखील नितेश राणेंच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलतांना राणे यांना वेडे ठरवले आहे.