नागपूर : एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने पोलीस हवालदाराच्या उच्चशिक्षित मुलीला आर्थिक मदतीचे प्रलोभन दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. तिला तिचे न्यूड फोटो पाठविण्याची धमकी दिली. ती प्रतिसाद देत नसल्याचे पाहून तिच्या घरात शिरून पिस्तुलाच्या धाकावर तिच्याशी अश्लील चाळे केले. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. धनंजय सावरे (५६, रा. धामणगाव, जि. अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून तो अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यात ठाणेदार आहे. या घटनेमुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे.
पीडित २२ वर्षीय तरुणी अमरावती जिल्ह्यातील आहे. तिचे वडीलसुद्धा पोलीस खात्यात आहेत. तिच्या वडिलाच्या तुकडीतील पोलीस शिपाई धनंजय सायरे याच्याशी त्यांची मैत्री होती. त्यामुळे धनंजयचे नेहमी त्यांच्या घरी येणेजाणे होते. धनंजय पोलीस खात्यांतर्गत परीक्षा देऊन शिपायाचा पोलीस अधिकारी झाला होता. सध्या तो अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यात ठाणेदार आहे. त्याची वाईट नजर हवालदार मित्राच्या तरुण मुलीवर पडली. पीडितेचे एमटेकपर्यंत शिक्षण झाले असून तिला पोलीस अधिकारी बनायचे आहे. त्यासाठी ती नागपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.
अकोल्यातील खदानचा पोलीस निरीक्षक धनंजय सायरे याने तिच्याशी मैत्री केली. पाच वर्षांपासून दोघांची एकमेकांशी ओळख आहे. यादरम्यान सायरे तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याच्या उद्देशाने नुकताच आयफोन भेट दिला. तिला आर्थिक मदत करू लागला.
धनंजय सायरे वारंवार नागपुरात येऊन तिला भेटत होता. काही दिवसांपासून सायरे तिला व्हॉट्सअॅपवर अश्लील मॅसेज पाठवीत होता. ‘तू मला न्यूड फोटो पाठव, असा मॅसेज करून स्वतःचा नग्न फोटो त्याने तिला पाठवला. त्यामुळे तिला धक्का बसला. तिने फोटो पाठवण्यास नकार दिला. त्यानंतर चिडलेल्या सायरेने तिला हॉटेलमध्ये भेटायला येण्यास सांगितले. तिने भेटायला येण्यास नकार दिला. त्यामुळे सायरे १८ मे रोजी सायंकाळी नागपुरात आला.
तो थेट तिच्या घरी गेला. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी करीत तिच्यावर बळजबरी करण्यास सुरुवात केली. तिने नकार देताच तिच्यावर पिस्तूल रोखून अश्लील चाळे सुरू केले. त्याने तिला भेट दिलेला आयफोन हिसकावून तिला मारहाण केली. तिने आरडाओरड केली आणि थेट नंदनवन पोलीस ठाणे गाठले. पोलिसात वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सायरेविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.