चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. नऊ महिन्याच्या बाळाला विष पाजून आईने गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २८ जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वरोरा तालुक्यातील शेगावमध्ये घडली आहे.
पल्लवी मितेश पारोधे (वय-27) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, 9 महिन्यांच्या स्मित मितेश पारोधेची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथील नितेश पारोधे यांचे दोन वर्षांपुर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील पल्लवी विनोद ढोके या युवतीसोबत लग्न झाले. त्यांना 9 महिन्याचा स्मित नावाचा मुलगा आहे.
मितेश पारोधे यांचा 9 महिन्यांचा मुलगा घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. तर पत्नी पल्लवी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि तपासाची चक्र फिरवत आरोपींना ताब्यात घेतले.
तसेच पत्नी पल्लवीचा मृत्तदेह ताब्यात घेऊन 9 महिन्याच्या बाळाला तत्काळ वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले असून महिलेचे आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
पल्लवीच्या वडिलांचा गंभीर आरोप
दरम्यान, लग्नानंतर काही महिन्यांतच सासरची मंडळी पैशांसाठी वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. तसेच माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून माझ्या नातवाची आणि माझ्या मुलीची तिचा पती व सासरच्यांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप पल्लवीच्या वडिलांनी केला आहे. तक्रारीनुसार शेगाव पोलिसांनी हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पल्लवीच्या पतीसह दिराला अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंह यादव करत आहेत.