रामटेक (नागपूर): विवाहबाह्य संबंधातून लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या प्रेयसीचा व्यावसायिक प्रियकराने गळा आवळून खून केला. आरोपीने तिचा मृतदेह तालुक्यातील अंबाडालगतच्या आमगाव शिवारात पुरला. तो मृतदेह काढण्यासाठी मानकापूर पोलिसांचे पथक बुधवारी (११ सप्टेंबर) दुपारी तीन वाजता रामटेकात दाखल झाले. स्थानिक पोलीस व तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांची मदत घेत घटनास्थळाकडे रवाना झाले.
ही घटना मंगळवारी (१० सप्टेंबर) उघडकीस आली होती. महेश केशव वळसकर (५७, रा. न्यू सोमवारी पेठ, सक्करदरा, नागपूर), असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. प्रिया बागडी (२४, रा. फरस गोधनी, नागपूर), असे खून करून मृतदेह पुरलेल्या प्रेयसीचे नाव आहे. आरोपी महेशची दुधाची पावडर तयार करण्याची कंपनी होती. याच कंपनीत मृतक प्रिया कामावर होती. कामादरम्यान आठ वर्षांपूर्वी आरोपी महेशचे प्रियासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने रामटेक येथे भाडेतत्त्वावर लॉजिंग व हॉटलचा व्यवसाय सुरू केला होता.
माहितीनुसार, मृतक प्रिया ही नेहमी लॉजवर येऊन थांबत असल्याची माहिती आहे. प्रियाचा मोबाईल आठ दिवसांपासून बंद असल्याने प्रियाच्या आईने ती हरविल्याची तक्रार मानकापूर पोलीस ठाण्यात दिली. झोन दोनचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलिसांनी प्रियाचा शोध सुरू केला. तिचे लोकेशन येथील हॉटेलमध्ये असल्याचे समजले. संबंधित हॉटेल आरोपी महेशचे होते. आरोपी महेश हाच प्रियाचा संपूर्ण खर्च भागवीत होता. त्यामुळे प्रिया नेहमीच आरोपीच्या हॉटेलवर येऊन थांबायची. मागील महिनाभरापासून प्रियाने लग्नासाठी आरोपीला तगादा लावला होता. त्यामुळे प्रियाला मार्गातून हटविण्यासाठी आरोपीने तिचा गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह येथून काही किमी अंतरावरील आमगाव शेतशिवारातील निर्जन जागी नेऊन पुरला.
मंगळवारी आरोपी महेशने प्रियाच्या खुनाची कबुली दिली व बुधवारी आरोपीने सांगितलेल्या ठिकाणावर मानकापूर पोलिसांचा ताफा पोलीस निरीक्षक अमोल इंगोले यांच्या नेतृत्वात धडकला. घटनास्थळ रामटेक पोलीस हद्दीत असल्याने येथील पोलिसांची मदत घेण्यात आली. तहसील प्रशासनाला कळवण्यात आले. दोन पोलीस व नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत मृतदेह काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी तो नामपुर मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांना घटनास्थळावर काही संशयास्पद बाबी आढळल्याचे सांगण्यात येते. तपासाचा भाग म्हणून मृतक प्रेयसी ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, त्या हॉटेलची तपासणी करण्यात आली आहे. पुन्हा पुराव्यासाठी आरोपीचे हॉटेल व घटनास्थळाची पाहणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.