नागपूर : विदर्भात सलग दोन दिवस अवकाळी पावसाची हजेरी पहायला मिळत आहे. पाऊस आणि गारपिटीने पिकांना अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. अक्षरशः बोराच्या आकाराच्या गारा पडल्या आहेत. 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
वर्धा जिल्ह्यातील सालापूर, मारडा, कळमना, कोरा, काकरापार, मंगरूळ, रासा, मोहगा आणि अन्य गावांमध्ये दमदार गारपीट झाली. गारांमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसान भरपाईचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनाने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने जोर धरू लागली आहे.
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बोरी, चातारी, सावळेश्वर, माणकेश्वर, गंजगाव, कोपरा, देवसरी इत्यादींसह आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीटने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. त्याचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील काढणीला बसला. गहू, चना, तूर आणि ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले.
सोमवारीही पावसाचा इशारा
मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इत्यादि जिल्ह्याना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.