गडचिरोली : गाय वाटप घोटाळ्याशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत गाय वाटप घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्यात भामरागडचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी आयएएस शुभम गुप्ता दोषी आढळले होते. त्यांची पुन्हा विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी जिल्हा दौऱ्यावर असताना दिली आहे. मागील आठ दिवसांपासून शुभम गुप्ता यांची विभागीय चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाई होईल. असेही मंत्री अशोक उईके यांनी यावेळी म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
भामरागडचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी लाभार्थ्यांना गाय वाटप करताना मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचे तपासात समोर आले होते. तसेच या प्रकरणी आवाज उठवणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. याबाबत आदिवासी विकास विभागाचे तत्कालीन आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी प्रकरणाची चौकशी करून 507 पानांचा अहवाल सदर केला. यात गुप्ता दोषी असल्याचे म्हटले होते. तरीदेखील गुप्ता यांच्यावर कारवाई झाली नव्हती.
त्यानंतर गडचिरोलीतून त्यांची बदली झाली. त्यानंतर त्यांची सातारा व नंतर विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्त करण्यात आली होती. मात्र अवघ्या 25 दिवसातच त्यांची पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळावर व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या 8 दिवसांपासून शुभम गुप्ता यांची विभागीय चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाई होईल. त्यांना कदापीही पाठीशी घातले जाणार नाही, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी गडचिरोली दौऱ्यावर असताना दिली.