भंडारा : विदर्भातील भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात गोबरवाही या गावात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अश्लील डान्सचा हैदोस घातल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात अश्लीलतेचा कळस गाठण्यात आला. त्या संबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली असून या प्रकरणात गुन्हाही दाखल केला आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिले आहे.
भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोबरवाही येथे मंडई निमित्त आयोजित हंगामा कार्यक्रमात विवस्त्रावस्थेतील अश्लील डान्स करण्यात आला. हा कार्यक्रम 17 नोव्हेंबरला पार पडला होता. आता त्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी नागपूरच्या आरके डान्स हंगामा ग्रुपच्या तिघांसह कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आणि अश्लील व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करणाऱ्या पाच जणांविरुद्ध कलम 354, 354 ब, 294, 509 भांदवी अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या कार्यक्रमात हजर असतानाही कर्तव्यात हलगर्जी करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
किशोर मनिराम गौपाले (लावणी कार्यक्रमाचे आयोजक रा. नाकाडोंगरी), आर.के. डान्स गृप नागपुर मधील काळा शर्ट घातलेला एक इसम, राम आहाके (संचालक, आर. के. डान्स गृप नागपूर रा. नागपूर), आर.के. डान्स गृप नागपूरचे सदस्य, अज्ञात (प्रसार माध्यमात व्हिडीओ क्लीप व्हायरल करनारा इसम) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राकेशसिंग सोलंकी (हेड कॉन्स्टेबल) आणि राहुल परतेती (पोलीस शिपाई) निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबत अधिक तपास भंडाऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बागुल करीत आहेत.