नागपूर : बाहेरगावावरून मोटारसायकलने नागपूरकडे परत येणाऱ्या वेकोलिच्या एका कर्मचाऱ्याला तोतया पोलीस कर्मचाऱ्याने लुटल्याची घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. शरद भांडेकर (५५, रा. बजरंगनगर) हे वेकोलित कार्यरत असून त्यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. तोतया पोलिसांनी वर्धामार्गावर त्यांची दुचाकी थांबवत हातचलाखी करून त्यांची सव्वा तोळ्याची चेन लंपास केली. शनिवार, ११ मे रोजी भांडेकर दुपारी दुचाकीने कान्होलीबारा येथे गेले होते. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ते तेथून परतत होते.
जामठा येथे त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोन तोतया पोलिसांनी दुचाकीतून वास येतो आहे, असे सांगत त्यांना थांबविले. स्वतःचे ओळखपत्र दाखवत आपण गुन्हे शाखेत कार्यरत असल्याची बतावणी केली. दुचाकीतून कुठलाही वास येत नसल्याचे भांडेकर यांनी सांगितल्यावर त्यांच्या गळ्यातील चेन एका कागदात काढून ठेवायला सांगितली. आरोपींनी तो कागद एका दुपट्ट्यांत बांधला व भांडेकर यांना दिला. असाच प्रकार त्यांनी आणखी एका दुचाकीस्वारासोबत त्याचवेळी केला. भांडेकर काही अंतर समोर गेले असता त्यांना शंका आली. त्यांनी दुपट्टा उघडून पाहिला असता त्यात नकली चेन होती. भांडेकर यांनी घटनास्थळावर जाऊन पाहिले असता तेथे कुणीच नव्हते. त्यांनी हिंगणा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तोतया पोलिसांचा शोध सुरू केला आहे.