गोंदिया : जंगलातून वस्तीच्या भागात आलेल्या भल्यामोठ्या अजगराने कोंबड्यासह लोखंडी रॉड गिळून घेतला होता. हा प्रकार अर्जुनी मोरगांव तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी येथे घडला आहे. घडलेली घटना नागरिकांच्या लक्षात आल्याने सर्पमित्रांना बोलावून कोंबडा व लोखंडी रॉड बाहेर काढण्यात आला असून अजगर सापाला निसर्गात सोडून देण्यात आले आहे.
६ ते ७ फूट लांबीचा अजगर..
गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी येथे ही घटना घडली. आदर्श धाबेटेकडी येथील पोल्ट्री फाॅर्ममध्ये ६ ते ७ फूट लांबीचा अजगर साप घुसला होता. या अजगराने दोन किलो वजनाचा कोंबडा गिळून घेतला होता. याच सोबत लोखंडी रॉड देखील गिळंकृत केला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान पोल्ट्री फॉर्ममध्ये अजगर शिरल्याची माहिती मिळताच सर्पमित्र यांना बोलाविण्यात आले होते.
सर्पमित्राने अजगर सापाला रेस्क्यू करून पकडले असता त्यामध्ये कळले की सापाने कोंबडीसह लोखंडी रॉड सुद्धा गिळला आहे. याची तत्काळ माहिती वनविभागाला देण्यात आली.
वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अजगर सापाला पशु वैद्यकीय दवाखाना मोरगाव अर्जुनी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने सापाने गिळलेला कोंबडा व लोखंडी रॉड बाहेर काढण्यात आले. त्यांनतर अजगर सापावर उपचार करून त्याला निसर्गात सोडण्यात आले आहे.