अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कॉंग्रेस उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आज झालेल्या बैठकीत डॉ. अभय पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 4 एप्रिल रोजी महाविकास आघाडीतील नेते तसेच स्वत: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत अभय पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
अभय पाटील यांच्या निवासस्थानावर ही बैठक पार पडली. या बैठकीला अकोल्यातले महाविकास आघाडीतले तिन्ही घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्यासह ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर बैठकीला उपस्थित होते.
अकोल्यात भाजपने संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून स्वत: प्रकाश आंबेडकर लढणार आहेत. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जरी महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेतला तरी आतापर्यंत नागपूर आणि कोल्हापूर या दोन मतदारसंघात काँग्रेसला पाठींबा दिला आहे.
त्यामुळे अकोल्यात काँग्रेस आंबेडकरांना पाठींबा देणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, अकोल्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून डॉ. अभय पाटील यांचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.