नागपूर : लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेसकडून पूर्व विदर्भातील जिल्हानिहाय आढावा बैठक नागपूरच्या महाकाळकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आज चव्हाट्यावर आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोरच दोन गट एकमेकांना भिडले.
प्रदेशाध्यक्षांसमोरच एकमेकांची कॉलर पकडण्यापासून ते कपडे फाडण्यापर्यंत हाणामारी झाली. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. भाषण करण्याच्या मुद्द्यावरून बैठकीत वाद झाल्याची माहिती मिळत आहे.
नागपूर येथे काँग्रेसची आढावा बैठक आज आयोजित केली होती. या बैठकीत माईकवर भाषण करण्यावरून वाद झाला. वादानंतर पदाधिकारी एकमेकांसमोर उभे ठाकले. दोन गटात हाणामारी देखील झाली. स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वादामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
नरेंद्र जिचकार आणि विकास ठाकरे यांच्यात जोरदार राडा झाला. या बैठकीतच माझा घातपात करण्याचा डाव होता, असा धक्कादायक आरोप जिचकार यांनी केला. तर, विकास ठाकरे यांनी जिचकार हे मानसिक रुग्ण असून कुटुंबाने किंवा पक्षाने वैदकिय चाचणी करावी असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.