गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईची हत्या आणि त्यानंतर मारेकऱ्याने आत्महत्या केल्याची भयंकर घटना आहे. ही घटना सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला गावात घडली आहे. सुलकनबाई बनोठे (वय वर्ष 75) आईचे नाव आहे, तर लेखराज बनोठे (वय 54) असं मुलाचं नाव आहे.
या घटनेत दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध आईकडे पैसे मागितले होते. मात्र, तिने त्याला पैसे दिले नाहीत म्हणून त्याने आईवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर आरोपी मुलाने देखील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुलकनबाई बनोठे व तिचा मुलगा लेखराज बनोठे हे दोघे एकत्र राहत होते. रात्री लेखराज बनोठे याने आई सुलकनबाई हिला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, आईने पैसे न दिल्याने मुलाने रागाच्या भरात आईवर कुऱ्हाडीने डोक्यात वार केला. यामध्ये सुलकनबाई गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तर आईचा मृत्यू झाल्याचे मुलाला कळताच मुलाने देखील घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती सालेकसा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.