Politics : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी आपापली रणनीती आखली असून सर्व पक्षांनी कबर कसली आहे. तसेच, विधानसभेच्या दृष्टीकोनातून आपल्या समीकरणांची जुळवाजुळव करण्यासाठी सध्या सर्वच पक्षांच्या बैठकांचं सत्र बघायला मिळत आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना बघायला मिळणार असल्याच बोललं जात आहे. आता मात्र राज्याच्या राजकारणातील मोठी घाडमोड समोर येत आहे. आता राज्याच्या निवडणुकीत एकसंघ राजकीय आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षांची एकसंघ राजकीय आघाडी मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे.
रिपब्लिकन पक्षांमधील आठवले, गवई, कवाडे गट आता एकसंध निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. एकीकृत रिपब्लिकन समितीच्या वतीनं प्रयत्न सुरू झाले आहेत. चर्चेत भाजपसोबत असलेला आठवलेंचा पक्षही सहभागी झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट, तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आंबेडकरी विचारसरणीच्या विविध संघटनांची मोट बांधून एकसंघ रिपब्लिकन आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे दिसत आहे. एकीकृत रिपब्लिकन समितीच्या वतीनं हे प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळत आहे.
नेमका कुणाला बसणार धक्का?
चर्चेच्या पातळीवर या एकसंघ रिपब्लिकन राजकीय आघाडी उभारण्याच्या प्रयत्नात सध्या भाजपसोबत असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे, तसेच शिंदेंच्या शिवसेनेसोबत असलेले जोगेंद्र कवाडे गटाचे प्रतिनिधीही सहभागी झाले आहे. त्यामुळे आठवले आणि कवाडे महायुतीतून बाहेर पडतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजपा आणि शिवसेना शिंदे गट या दोन पक्षांना धक्का बसणार अस बोलल जात आहे.
राज्यातील छोट्या छोट्या रिपब्लिकन पक्षांना तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आंबेडकरी विचारसरणीच्या संघटनांना राजकीय आघाडीच्या स्वरूपात एकत्रित आणण्यासाठी एकिकृत रिपब्लिकन समितीने वेगवेगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षांशी बोलणं करून त्यांची नागपुरात बैठक बोलावली होती.
नवं आव्हान कुणाला?
बैठकीत आठवले, गवई, कवाडे या रिपब्लिकन पक्षाच्या सर्व प्रमुख गटांसह आंबेडकरी विचारसरणीच्या सामाजिक संघटना तसेच बौद्ध महासभेच्या प्रतिनिधींनी ही सहभाग नोंदवला आहे. सर्व छोट्या छोट्या रिपब्लिकन पक्षांची आणि समविचारी सामाजिक संघटनांची मोट बांधून एकसंघ रिपब्लिकन पक्ष उभारण्याचा अंतिम उद्दिष्ट या बैठकीत निश्चित करण्यात आलं आहे. सर्व रिपब्लिकन पक्षांचा एक पक्ष तयार होण्यास वेळ लागत असेल. तर तोपर्यंत रिपब्लिकन पक्षांची राजकीय आघाडी उभारावी आणि त्याद्वारे आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, असा निर्णय ही त्या बैठकीत झाला आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीनंतर तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरू असताना आता रिपब्लिकन पक्षांची एकसंघ राजकीय आघाडी उभारण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीसमोर या रिपब्लिकन पक्षांची ही नवी राजकीय आघाडी नवं आव्हान उभं करणार काय? हे बघण म्हत्वाच ठरणार आहे.