नागपूर: नागपुरातील यशोधरानगर परिसरात दोन कुख्यात गुंडांमध्ये गँगवॉर सुरू झाल्याचं समोर आलं आहे. या गँगवॉरमध्ये एका गुंडाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी(12 एप्रिल) सकाळी उघडकीस आली. आसीफ बबलू खान (वय 23, रा.प्रवेशनगर) आणि रोहित (वय 22, रा. यशोधरानगर चौक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मोहम्मद नईम मोहम्मद वकील अन्सारी (वय 28, रा. प्रवेशनगर) असं मयताचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आसीफ आणि मोहम्मद नईम हे दोघेही कुख्यात गुंड आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्यात वैर आहे. या वैरातून त्यांच्यात अनेकदा मारहाण झाली आहे. आरोपी आसीफ हा मोटार मेकॅनिक म्हणूनही काम करतो. त्याच्यावर यशोधरानगर आणि इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गँगवॉरच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी(11 एप्रिल) नईम आणि आसिफ यांच्यात तुंबळ हाणामारी झाली होती. शुक्रवारी सकाळी एका किराणा दुकानाजवळ ही घटना घडली.
दरम्यान, संतप्त झालेल्या आसीफने नईमला संपवण्याची खुनगाट मनाशी बांधली. शनिवारी सायंकाळी तो नईमला भेटला. तेंव्हा आसीफने धारदार चाकूने नईमच्या पोटावर वार केला. त्यात मोहम्मद नईम याचा मृत्यू झाला. हल्ला करून केल्यानंतर आसीफ आणि त्याचा मित्र रोहित घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.