मारेगाव (यवतमाळ): निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या बांधकामाच्या वादातून महिला सरपंचासह तिच्या पतीने उपसरपंचावर धारदार विळ्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर उपसरपंचाला अपमानित झाल्याचे वाटून त्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, ही खळबळजनक घटना रविवारी, १५ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील बनोजादेवी येथे घडली.
प्रशांत प्रकाशचंद भंडारी (४३) असे विषारी द्रव्य प्राशन करून प्रकृती चिंताजनक झालेल्या उपसरपंचाचे नाव आहे. तसेच डीमल गोवर्धन टोंगे (४८) असे महिला सरपंचाचे तर गोवर्धन टोंगे (५०, दोघेही रा. बनोजादेवी) असे तिच्या आरोपी पतीचे नाव आहे. उपसरपंच प्रशांत भंडारी यांनी गावातील सिमेंटच्या रस्ता निकृष्ट बनविला जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे केली होती. दरम्यान, रविवारी दुपारी उपसरपंच भंडारी हे लोहाराकडे शेतीकामासाठी विळा पाजविण्याकरीता गेले होते. तेथून ते रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी गेले. यावेळी त्यांना बांधकामात मातिमिश्रीत रेतीचा वापर होत असल्याचे आढळून आले. तेव्हा त्यांनी त्या रेतीचे मोबाइलद्वारे व्हिडीओ चित्रीकरण केले. यावेळी उपस्थित असलेल्या सरपंच डीमल आणि त्यांचे पती गोवर्धन यांना त्यांनी ही बाब लक्षात आणून दिली.
त्यातूनच वाद होऊन सरपंच डीमलसह पतीने विळा हिसकावून प्रशांतवरच हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर अपमानित झाल्याचे वाटून त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. सद्या ते वणी येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी सरपंचासह त्यांच्या पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
उपसरपंचावरही गुन्हा दाखल
उपसरपंचाने दिलेल्या तक्रारीनंतर सरपंच डीमल यांनीही त्यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यामध्ये उपसरपंच प्रशांत हे व्हिडीओ काढीत असताना तक्रार करण्याऐवजी विकास कामाला सहकार्य करा. काम रखडल्यास गावकऱ्याऱ्यांना त्याचा त्रास होईल, अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. मात्र उपसरपंच वाद घालून अंगावर धावून आले. शिवाय आपल्या छातीवर आणि कानावर दोन बुक्क्या मारल्या. हातातील विळ्याने वार करणार तेवढ्यात पती गोवर्धन यानी बचाव केला. तेव्हा संतप्त उपसरपंच प्रशांत थांबा तुम्हाला कसा फसवतो, तेच बघा असे म्हणत स्वतः चा हात विळ्याने कापून घेतला. एवढेच नव्हे, तर जवळील कीटकनाशक काढून घोट घेतला. तसेच पती गोवर्धन यांच्या तोंडावर आणि डोळ्यातही कीटकनाशक टाकले, असा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी उपसरपंच प्रशांत यांच्या विरोधातही विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.