नागपूर : नागपूरच्या पुरुषोत्तम पट्टेवार हत्याकांड प्रकरणात आता नवा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकणात गडचिरोलीच्या देसाईगंज येथील एका काँग्रेसच्या बड्या नेत्याचे नाव पुढे आले आहे. अटक टाळण्यासाठी हा नेता राज्यातील एका मोठ्या नेत्याच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव निर्माण करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संपत्तीसाठी सुपारी देऊन सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगर रचना विभागाची सहायक संचालक अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार यांना कट रचण्यात मदत केल्याचा या काँग्रेस नेत्यावर संशय आहे.
कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेले पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा 22 मे रोजी मुलीच्या घरी पायी जात असताना मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. सुरुवातीला या प्रकरणात अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पुरुषोत्तम त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉ. मनीष, सून अर्चना आणि मुलगी योगिता आहे.
अर्चना पुट्टेवार या गडचिरोली नगर रचना विभागाच्या सहायक संचालक होत्या. तर सुक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक प्रशांत पार्लेवार याचा मोठा भाऊ प्रविणची योगिता ही पत्नी असून तिने पार्लेवारच्या संपत्तीतील वाटा मिळावा म्हणून न्यायालयीन लढा सुरू केला होता.
काँग्रेस नेत्याचं कनेक्शन काय?
नागपूरच्या पुरुषोत्तम पट्टेवार हत्याकांड प्रकरणात गडचिरोलीच्या देसाईगंज येथील एका काँग्रेस नेत्याचे नाव समोर आलं आहे. या काँग्रेस नेत्याला गडचिरोलीमध्ये कोळसा पट्टा हवा होता, तर अर्चना पट्टेवार यांना आपली बदली हि प्रमोशन सह चांगल्या जागेवर पोस्टिंग हवी होती. त्यामुळे हे एकत्र आल्याचे बोलले जात आहे.