नागपूर : नागपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासूचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करून विधवा सुनेने नातेवाइकांना विश्वासात घेऊन अंत्यसंस्कार पार पाडले. सर्व काही सुरळीत पार पडल्याच्या आवेगात सूनबाई वावरत असताना अचानक पाल चुकचुकली. शेजारी आणि तिच्या स्वतःच्या पाच वर्षाच्या मुलीने दोन मामांच्या मदतीने आजीचा खून करण्यात आल्याचे नातेवाइकांना सांगितले आणि सूत्रे हलली.
सासूचा भाऊ आणि नातेवाइकांनी या प्रकरणाचा पिच्छा पुरविला आणि सुनेकडून झालेला प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न केला; पण सून ठाम होती. अखेर भावाने त्यांच्या बहिणीची सुनेने हत्या केल्याच्या संशयावरून पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी सुनेला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता धक्कादायक सत्य बाहेर आले. विधवा सुनेने पतीचे निधन झाल्यानंतर लाखोंची संपत्ती हडपण्यासाठी दोन चुलत भावंडांच्या मदतीने दोन लाखांची सासूच्या खुनाची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अजनी पोलिसांकडून आरोपी विधवा सून आणि तिच्या दोन चुलतभावांना अटक करण्यात आले आहे.
आईना बीपीचा त्रास होता तर..
भगवान भाऊराव मेंढे (५७, रा शिवाजी कॉलनी, हुडकेश्वर, नागपूर) यांची बहीण सुनीता ओंकार राऊत (५४) ही त्यांचे पती व मुलगा मरण पावले असून त्या तिची विधवा सून वैशाली अखिलेश राऊत (३२) आणि नात (५) यांच्यासोबत मित्रनगर, अजनी, नागपूर येथे राहत होती. २०२३ मध्ये वैशालीचा पती अखिलेशचा आजारपणात मृत्यू झाला. त्यानंतर सासू सुनेसोबत राहू लागली. २८ ऑगस्ट रोजी सुनीता ओंकार राऊत हिचा मृत्यू झाल्याचे शेजारी राहणाऱ्या एका महिलेने भगवान मेंढे यांना फोन करून सांगितले.
त्यामुळे ते लगेच बहिणीच्या घरी गेले. त्यांना बहीण सुनीता बेडवर पडल्याचे दिसले. मेंदे यांनी तिची सून वैशाली हिला विचारणा केली असता तिने ‘आईना बीपीचा त्रास होता तर हार्ट अटॅकने मृत्यू झाला, असे सांगितले. सुनीता राऊत यांच्या मृत्यूची खात्री पटल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर त्याचदिवशी रात्री ८.४५ वाजता सर्व नातेवाइकांच्या उपस्थितीत मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नातीने सांगितली आपबिती..
अंत्यसंस्कार आटोपून सर्वजण घरी आल्यानंतर शेजारी राहणाऱ्यांनी भगवान मेंढे यांना सासू आणि सुनेमध्ये वाद झाल्याची बाब कानावर टाकली. त्याचवेळी पाच वर्षांच्या नातीने मेढे आणि नातेवाइकांना रात्रीच्या वेळी दोन मामा मागच्या दरवाजाने घरात आले आणि त्यांनी आजीला गळा दाबून मारल्याचे सांगितले. याचदरम्यान २९ ऑगस्ट रोजी किरायदार महिलेने मेंढे यांना २७ ऑगस्टला वैशालीने तिचे वडील चिकुनगुनियाने अॅडमिट असल्याचे सांगून त्यांच्याकडून १० हजार रुपये उधार घेतल्याचे आणि त्यांच्याच मोबाइलवरून श्रीकांत हिवसे याला ऑनलाइन पाठविल्याचे सांगितले.
मात्र वैशालीचे बडील सुनीता यांच्या अंत्यविधीला दुसऱ्या दिवशी हजर असल्याचे पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याचे सांगितले. भगवान मेंडे आणि नातेवाइकांना वैशालीवर संशय आल्याने त्यांनी तिचा मोबाइल तपासला असता कॉल लॉगमध्ये २७ ऑगस्टच्या रात्री एका क्रमांकावर वारंवार फोन केल्याचे आढळून आले. या मोबाइल क्रमांकाबाबत त्यांनी वैशालीला विचारले असता तो क्रमांक तिचा गावाकडचा चुलत भाऊ श्रीकांत उर्फ समीर हिवसे याचा असल्याचे सांगितले. त्यावरून नातेवाइकांचा वैशालीवर संशय अधिकच बळावला. वैशालीनेच तिची सासू सुनीता राऊत हिला जिवानिशी ठार मारल्याचे पक्के झाले.
अखेर खून केल्याचे कबूल..
त्यानुसार ८ सप्टेंबर रोजी भगवान मेंढे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी वैशाली राऊतविरोधात गुन्हा दाखल केला. ९ सप्टेंबर रोजी पोलिसांनी भाडेकरूंना विचारणा केली असता त्यांनी वैशालीच्या सांगण्यावरून श्रीकांत हिवसेला पैसे पाठविल्याचे सांगितले. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी वैशालीला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. तिच्या सासूचा मृत्यू हार्ट अटॅकनेच झाल्याचे सांगितले; मात्र वैशाली खोटे बोलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
त्यांनी मिळालेली माहिती व तांत्रिक तपासावरून पोलिसी खाक्या दाखविताच तिने चुलत भाऊ श्रीकांत उर्फ समीर नरेंद्र हिवसे (२५) व रितेश प्रकाश हिवसे (२७, दोन्ही रा. गाव भांडारगोंडी, ता. जि. पांढुर्णा, मध्यप्रदेश) यांच्यासोबत मिळून सासू सुनीता राऊत हिचा खून केल्याचे कबूल केले.
हा नैसर्गिक मृत्यू नसून खून असल्याचे उघडकीस आणण्याची कार्यवाही पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) लक्ष्मण केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत उपाध्ये, पंकज बावणे, स्वाती माळी, पुष्पांजली जांभळे, गणेश मुंढे, पोलीस हवालदार ओंकार बारभाई, मनोज नवोरे, पोलीस अंमलदार संतोष नल्लावार, नितीन सोमकुंवर, अश्विन सहारे, नरेश श्रावणकर, कुणाल उके, रूखसार शेख, भीमराव यांनी पार पाडली.
विधवा सुनेचे पतीच्या मित्रासोबतच प्रेमसंबंध..
पतीच्या निधनानंतर एकट्या पडलेल्या वैशालीचे काही दिवसांतच अनिल नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध जुळले. तो तिच्या पतीचा मित्र असलायची माहिती समोर येत आहे. तो सासू बाहेर गेल्यावर घरी येऊ लागला. विधवा सूनेच्या प्रेमसंबंधाची सासू सुनीता यांना कुणकुण लागली होती. त्यामुळे त्यांनी कुटुंबाची इज्जत वाचविण्यासाठी सुनेची समजूत घातली. परंतु, दोघाचे प्रेमसंबंध सुरूच राहिले. त्यामुळे सासू वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करू लागली, त्यामुळे दोघीचे दररोज मांडण व्हायचे.