अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी येथील एका दैनिकाच्या पत्रकाराने सेवानिवृत्त पोलिस उप निरीक्षक विलास गोविंदराव सिडाम (वय 58, पोलिस स्टेशन क्वार्टर, घाटंजी) यांस 15,000 रुपयाची खंडणी मागून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी संशयीत आरोपी कज्जूम कुरेशी (वय 44, गुरुदेव वार्ड, घाटंजी) विरुद्ध अपराध क्रमांक 834/2024 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 308 (2), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा 1989 ॲट्रोसीटी ॲक्ट 3 (1) (r), 3 (1) (S) 3 (2) (va) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळाला पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने, घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार निलेश सुरडकर यांनी भेट दिली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने हे करित आहे. विशेष म्हणजे सदरचा गुन्हा दि. 21 सप्टेंबर 2024 रोजीच्या अर्जावरुन चौकशी अंती दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पांढरकवडा येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयाचे पोलिस पथक आरोपी कज्जूम कुरेशी यास अटक करण्यासाठी गेले असता, आरोपी फरार असल्याचे निदर्शनास आले. पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पोलिस पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणिती लांजेवार, रवि सिंहे, पीसी देठे व पीसी महेश आदींचा समावेश होता.
घाटंजी पोलिस स्टेशनचे सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक विलास सिडाम हे दिनांक 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने सद्या ते कुटूंबासह पोलिस स्टेशनच्या क्वार्टर मध्ये राहत आहे. दैनिक साहसिक (वर्धा) व दैनिक मतदार (यवतमाळ) चे घाटंजी बातमीदार कज्जूम कुरेशी यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो, असे सिडाम यांच्या लेखी तक्रारीत नमुद आहे. सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक विलास सिडाम यांचे निवृत्ती वेतनाचे पैसे मिळायचे असल्याने ते सरकारी निवासस्थानी वास्तव्य करित आहे.
दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक विलास सिडाम हे सायंकाळी शेतातून परत येत असतांना पत्रकार कज्जूम कुरेशी हा पोलिस स्टेशनच्या दाराजवळ उभा दिसला. सिडाम हे पत्रकार कज्जूम कुरेशी याला दिसताच त्याने ‘तुम बहोत सालोंसे सरकारी क्वार्टर में रह रहे है. अब रिटायर्ड होने के बाद भी क्वार्टर क्युं नही छोडते.’ असे म्हटले. तेव्हा, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक विलास सिडाम यांनी म्हटले की, ‘मेरे घरका काम चालू है. घरका काम पुरा होने के बाद यहां से चले जायेंगे’ असे म्हटले. तेव्हा, पत्रकार कज्जूम कुरेशी यांनी सिडाम यांना सांगितले की, तुम्ही सरकारी क्वार्टर सोडत नाही, म्हणून मी तुमची बातमी तयार केली आहे. अगर पेपर में नही छापना है तो, मुझे 15,000 रुपये देना पडेगा, असे सिडाम यांना तथाकथित पत्रकाराने म्हटले. तेव्हा, सिडाम यांनी सांगितले की, मला एक दोन महिने सरकारी क्वार्टर मध्ये थांबायचे आहे.
दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी व्हाॅटसॲप ग्रुप वर विदर्भ मतदार या वर्तमानपत्राचे कात्रण आले. त्या बातमीत सिडाम हे राहत असलेल्या क्वार्टरची बातमी कज्जूम कुरेशी यांनी प्रसारित केली होती, असा आरोप सिडाम यांनी आपल्या लेखी तक्रारीत केला आहे. त्यामुळे पेपरला बातमी आल्याने सिडाम यांची बदनामी झाली, असे सिडाम यांनी सांगितले. तसेच दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी सिडाम हे मार्केट मध्ये भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. भाजीपाला घेऊन परत येतांना पोलिस स्टेशनच्या दाराजवळ कज्जूम कुरेशी हा बाजूला मोटार सायकल लाउन उभा होता.
तेव्हा त्याने सिडाम यांना आवाज देउन थांबविले व म्हणाला की, ‘जम गई क्या बातमी’. तेव्हा सिडाम यांनी सांगितले की, ‘भैय्या मैने तुमको 2,000 रुपये दिये और भी देता करके बोला था’. तो भी तुमने तुम्हारे पेपर में बातमी प्रकाशित की है, असे म्हटले असता बाकी के पैसे अभी देदो नही तो सभी पेपर में तुम्हारे फोटो सहीत बातमी लगायेंगे, अशी धमकी सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक विलास सिडाम यांना दिली. सिडाम यांच्या सोबत झालेल्या वादाच्या वेळी विजय चव्हाण, रा. खापरी व राहुल गायकवाड, रा. दुर्गामाता वार्ड घाटंजी हे हजर होते.सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने हे करित आहे.