सोलापूर : माढा हा लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील बहुचर्चित मतदारसंघ आहे. कालपर्यंत महादेव जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे खुद्द जानकर यांच्याकडून सांगितले जात होते. शरद पवार यांनी माढ्याच्या उमेदवारी जानकर यांनाच देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र वेगवान घडामोडी घडल्या आण जानकर महायुतीत सामील झाले आहेत. महायुतीने लोकसभेची एक जागा महादेव जानकर यांना देण्याची घोषणा केली आहे. आता मविआकडून माढ्याच्या जागेसाठी अन्य उमेदवाराचा शोध चालू आहे. प्रा. रघुनाथ पाटील यांचा या जागेसाठी विचार केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महादेव जानकर यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये माढा लोकसभेच्या उमेदवारीसाठी पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ही जागा धनगर समाजाला देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यशवंत सेनेचे प्रदेश संघटक प्रा. रघुनाथ पाटील यांच्या नावाची आता चर्चा केली जात आहे.
कोण आहेत प्रा. रघुनाथ पाटील?
प्रा. रघुनाथ पाटील यांना लढाऊ ग्रामीण नेत्रुत्व म्हणून ओळखले जाते. ते महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शिष्य आणि शरद पवार यांचे खंदे कार्यकर्ते आहेत. धनगर समाजात गेली २० वर्षे कुशल संघटक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी त्यांची चर्चा चालू असल्याची माहिती मिळत आहे. रघुनाथ पाटील हे मतदारसंघातील महत्त्वाच्या लोकांच्या भेटी घेत आहेत. त्यामुळे या जागेवर शरद पवार नेमकी कोणाला संधी देणार, याची उत्सूकता आहे.