सातारा: एका धक्कादायक घटनेत, माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक गावात २८ वर्षीय योगेश पवारची त्याची प्रेयसी रोशनी माने आणि तिची आई पार्वती माने यांनी हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश आणि रोशनी यांच्यात प्रेमसंबंध होते. दरम्यान, योगेश याने प्रेयसी रोशनी हिला लाखो रुपये उधार म्हणून दिले होते. परंतु अनेक दिवस झाल्यानंतरही रोशनी पैसे परत करायचं नाव घेत नव्हती. दरम्यान, योगेश याने रोशनी हिला उधार म्हणून दिलेले पैसे परत मागितले. पैसे परत मागितल्याच्या कारणावरून रोशनी आणि तिची आई पार्वतीने योगेश याला मारण्याचा कट रचला. दोघी आरोपींनी कट रचल्या प्रमाणे १८ मार्च रोजी रोशनी आणि तिच्या आईने योगेशला नरवणे येथील एका निर्जन ठिकाणी बोलावले, जिथे त्याची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अपघात झाल्याचे भासवण्यासाठी आरोपींनी योगेशचा मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकला आणि कार फडतराई येथील कालव्यात ढकलून दिली.
दरम्यान, योगेशसोबत काही संपर्क होत नाही आणि तो घरीही आला नाही म्हणून योगेशचा भाऊ तेजस याने २१ मार्च रोजी पोलीस ठाण्यात योगेश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला. दरम्यान, पोलिसांना कालव्यात योगेशची कार सापडली आणि त्याचा मृतदेह सापडला. योगेशच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी रोशनी, तिची आई पार्वतीला अटक केली आहे. सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.