पुणे : पुण्याचा सुपुत्र पैलवान तनिष्क प्रवीण कदम याने १५ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून पुण्यासह समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचवली आहे.
बहरीन येथे पार पडलेल्या आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय कुस्ती संघाने 4 सुवर्ण, 2 रजत तर 1 कांस्य पदक पटकावले.
तनिष्क हा पै. विजय बराटे यांच्या वारजे येथील सह्याद्री कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत आहे.
या यशानंतर त्याच्यावर संपूर्ण देशातून शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. पुण्याचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्याचे कौतुक केले आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्ह्याचे सुपुत्र पैलवान तनिष्क प्रविण कदम यांनी बहरिन येथे झालेल्या 15 वर्षाखालील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तनिष्क यांचा सर्व पुणेकरांनाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. मनःपूर्वक अभिनंदन !