बीड: सोमवारी सकाळी बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. परळी येथील महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी ही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेत आहेत. दरम्यान, सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात अडकवल्याच्या कारणातून ही मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे .महादेव गीते आणि अक्षय आठवले गटाने सुदर्शन घुलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण तर वाल्मीक कराड याला कानशिलात लगावली, त्यामुळे वातावरण आणखी तापले होते.
दरम्यान, कारागृहात राडा झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटना स्थळी धाव घेत मध्यस्थी करून भांडण सोडवले. कारागृह प्रशासनाने अद्याप या घटनेला दुजोरा दिलेला नाही .परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हाणामारीत कोणीही गंभीर जखमी झाले नाही. घटनेची चौकशी सुरू आहे आणि तुरुंग प्रशासनाने या हाणामारीसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली आहे कि नाही याबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. सरपंचाच्या हत्येनंतर बीडमध्ये आधीच तणाव निर्माण झाला असून कारागृहात वाल्मीक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण केल्याच्या घटनेमुळे शहरात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.