सोलापूर : महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये मदत म्हणून दिले जाणार आहेत. या योजनेसाठी आता राज्यभरातील महिला अर्ज करत आहेत. त्यात अंगणवाडी सेविकांकडेही लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन काम करण्यासाठी दिलं आहे. परंतु त्यात आता लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन काम करणार नसल्याचे सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी म्हटले आहे.
यावेळी सोलापुरमधील अंगणवाडी सेविका म्हणाल्या, आम्ही केवळ ऑफलाईन फॉर्म स्वीकारून प्रकल्प कार्यालयात जमा करणार, परंतु ऑनलाईन अर्ज भरणार नाही, असं म्हटलं आहे. महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेने ही भूमिका स्पष्ट केली आहे.
अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मानधनवाढीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन केलं होतं. महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणताय तर मग अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का? असा प्रश्न यावेळी मांडण्यात आला.
नेहमीच सरकारची कोणीतीही योजना आली की त्या योजनेचे काम आम्हा अंगणवाडी सेविकांना दिले जाते, मात्र मागील अनेक महिन्यांपासून आम्हा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन वाढीसाठी आंदोलन सुरु असताना त्याकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही, अशी तक्रार अंगणवाडी सेविकांनी यावेळी केली आहे.