Sad News : पुणे : आपले संपूर्ण आयुष्य अध्यात्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी अर्पण करणारे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. नेरूळ (नवी मुंबई) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांचे पार्थिव आज दुपारी ३ नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखान्यासमोरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येईल. उद्या (शुक्रवारी, ता. २७) संध्याकाळी ५ वाजता नेरुळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्याकाळी दहावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतले. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी वेचले. (Sad News ) रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचे व्रत होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचे प्रबोधन केले.
विठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्वरी यावर बाबा महाराजांनी आयुष्य घालवले. बाबा महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी राज्यातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त जमत होते. अलिकडे वय झाल्यामुळे बाबा महाराज कीर्तनासाठी उभे राहात नव्हते. त्यांची ही परंपरा त्यांचा नातू पुढे नेत आहे. (Sad News ) दरम्यान, यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचे निधन झाले होते. त्यानंतर ८ महिन्यांतच बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली.
आई-वडिलांकडून मिळाले संस्काराचे धडे
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे उर्फ ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकरांच्या घरात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची आणि प्रवचनाची परंपरा जोपासली जात आहे. बाबा महाराजांनी हीच परंपरा पुढे सुरू ठेवली. बाबा महाराजांचे वडील ज्ञानेश्वर दादा महाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. चुलते आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांच्याकडून बाबा महाराज सातारकरांनी परमार्थाचे धडे घेतले. (Sad News ) बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. वयाच्या आठव्या वर्षांपासून बाबा महाराज श्री सद्गुरू दादा महाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायचे. तेथूनच त्यावर कीर्तनाचे संस्कार रुजत गेले. वयाच्या अकराव्या वर्षापासून त्यांनी पुरोहित बुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडेही घेतले आहेत.