पुणे : राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासूनच उन्हाच्या झळा सुरु झाल्या आहेत. अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. अशातच राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. उत्तर-प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राचा काही भाग आणि उत्तर अरबी समुद्राच्या बहुतांश भागातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासास शनिवारी (ता.05) पासून सुरवात झाली आहे.
पुणे व आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस तर कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर येते तुरळक ठिकाणी पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट आणि वादळी वा-यांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील इतर काही भागातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी (ता.06 ऑक्टोबर) संपूर्ण कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातून शनिवारी मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.
पावसाची उघडीप असलेल्या अनेक ठिकाणी उकाड्यात वाढ झाली आहे. ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवायला लागला आहे. मात्र, यंदा थंडीही लवकर पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.