नागपूर : विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने काही दिवसांपूर्वी सायबर फसवणुकीच्या घटनांचा हवाला देत नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर कोणतेही डिजिटल व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत, असा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनाच्या सूचनेनंतर आणि ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेता हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे.या ऑनलाइन पेमेंट व्यवहारांवर लावलेल्या बंदीचा निर्णय मागे घेण्यात आल्याने हजारो वाहनचालक आणि ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
नागपूर शहरात दररोज हजारो ग्राहक पेट्रोल पंपांवर विविध अॅप्सद्वारे पेमेंट करतात. मात्र, ग्राहकांचे खात्रीशीर तपशील आणि व्यवहाराची खरी माहिती न मिळाल्याने काही वेळा बनावट व्यवहार घडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पंपचालकांनी काळजी घेत ही तात्पुरती बंदी घातली होती. या निर्णयामुळे अनेक ग्राहकांना रोख रक्कम घेऊन पेट्रोल भरणे भाग पडत होते, ज्यामुळे गैरसोयींचा सामना करावा लागत होता.दरम्यान देशातील आर्थिक सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य प्रशासनाकडून सर्व व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, डीलर्स असोसिएशनने सामाजिक जबाबदारी जपत आणि ग्राहकांच्या सोयीसाठी नागपूर जिल्ह्यात ऑनलाइन पेमेंट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे आता नागपूर जिल्ह्यातील ग्राहक पूर्वीप्रमाणेच आपल्या पसंतीच्या अॅप्सद्वारे सहज आणि सुरक्षितपणे पेट्रोल पंपांवर पेमेंट करू शकतील. यामुळे रोख व्यवहारांची अडचण दूर होऊन, डिजिटल व्यवहारांद्वारे सुलभ सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.