रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री एका खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. महाड येथे सावित्री नदीवरील पुलावर ही घटना घडली असून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास बसमधील सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना धावत्या बसच्या टायरने अचानक पेट घेतला. टायरने पेट घेतल्यानंतर काही क्षणात बस आगीच्या भक्षस्थानी गेली. बसला आग लागली त्यावेळी बसमधून एकून १९ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या घटनेत जीवित हानी नाही, बसमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचं जवान घटनस्थळी दाखल झाले. काही वेळात अग्नीशमन दलाच्या जवानांनी बसला लागलेली आग विझवली. मात्र बस जवळपास पूर्ण जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती.