बीड : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांना झोपलेले असताना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केज तालुक्यातल्या ढाकेफळ येथे सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास घडला. मात्र लहान मुलांची आरडाओरड झाल्याने शेजारील लोकं जागे झाले. त्यांनी हि आग विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, गोविंद दिलीप थोरात आणि वैजनाथ व्यंकटी थोरात हे दोघे चुलत भाऊ पत्नी, दोन मुलांसह गावातील हनुमान मंदिराशेजारीच पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे ते आपल्या घरी झोपले असताना अडीचच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याच्या हेतूने त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावली.
पेट्रालमुळे आगीचा मोठा भडका उडाला. त्यामुळे घरातील सर्वजण जागे झाले. आगीचे लोळ पाहून गोविंद आणि बैजनाथसह घरातील लहान मुलांनी आरडाओरड केली. या आरडाओरडीने शेजारची लोक जागे झाल्यामुळे अनेकांनी पेटलेल्या घराकडे धाव घेतली. यावेळी काही नागरिकांनी पत्रे तोडून सर्वांना बाहेर काढले. या घटनेत वैजनाथ यांचा हात आणि पाय, डोक्याचा बराचसा भाग भाजला आहे. तसेच गोविंद थोरात आणि त्यांची बायको यांनाही थोड्याफार प्रमाणात जखमा झाल्या आहेत. मात्र, या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे हे करत आहेत.